महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.गिरीश महाजन प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी धुळे जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती हर्षवर्धन दहीते यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सभापती दहिते यांनी ना. महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, धुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी वैरण बियाणे, चारा टंचाईवर मात करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन व कृषी विभाग साठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून द्यावी तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत जीर्ण झालेल्या पशुवैद्यकीय दवाखाना बांधकामासाठी दोन कोटी रुपये, पशुसंवर्धन दवाखान्यातील यंत्रसामग्री व रसायने पुरवठा करण्यासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी सभापती दहिते यांनी ना. महाजन यांचा मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती संजीवनी सिसोदे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments