गर्जना न्युजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल
       : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाने लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केले आहे. मात्र जातीयवादी प्रवृत्तीचे लोक वारंवार मनुस्मृतीचे समर्थन करून संविधानाचे अवमूल्यन करतात. भारतीय संविधानाने जातिवाद्यांना मुळासकट उपटण्याचे काम केल्याने 'भारतीय संविधान’ जगात सर्वोच्च आहे. डॉ.बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून देताना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले. असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे केले. 
येथील डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे महामानव, भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात सौ.चव्हाण बोलत होत्या. त्यांच्यासह माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, शहरप्रमुख रविंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, महिला तालुकाध्यक्षा उषाताई भामरे, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल पाटील, शहराध्यक्ष किशोर कदम, अरविंद सोनवणे, रायुकाँचे तालुकाध्यक्ष टोनी मोरे, शहराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेविका सुरेखा बच्छाव आदींसह मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, भाजप सरकारकडून सातत्याने लोकशाहीची गळचेपी केली जात असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही घाला घातला जात आहे. संविधान संपविण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र डॉ.बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजातील उपेक्षित घटकांना समान संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून अशा संविधानाचा प्रत्येकाने सन्मान करावा. हे संविधान तसेच देशाचे रक्षण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यानंतर बुद्ध पुतळ्यास वंदन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.विठ्ठल येवलकर, राजनसिंह चौधरी, भिका सोनवणे, झिप्रू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, प्रकाश बच्छाव, अमोल बच्छाव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भारत बच्छाव, किशोर सोनवणे, पोपट बच्छाव, शांताराम खरे, पोपटराव सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.